Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पाऊस - विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी, वृक्ष उन्मळून पडले

अवकाळी पाऊस अपडेट - विदर्भ, मराठवाड्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपले, ठिकठिकाणी पिके झाली आडवी, वृक्ष उन्मळून पडले


काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाला असून गारपीट आणि अवकाळी पावसाचा सलग फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटेही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. घरे आणि शाळांवरील पत्रे उडाली, विजा पडून पशुधनाचेही नुकसान झाले आहे. चंद्रपूर, परभणी, जालना, जळगाव, नंदूरबार आणि लातूर जिल्ह्यातही नुकसान आहे. 

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात गेल्या २४ तासांत मुसळाधार अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाले. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला व बुलढाणा शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे.


संत्रा, कांदा, गहू पिकांचे नुकसान

अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. वरुड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागात पुन्हा गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संत्रा, कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामूळे चांदुर बाजार तालुक्यातील जमापूर आणि बंड गावात घरांची मोठी पडझड झाली.


दोन दिवस ढगाळ वातावरण

बुलढाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांत शनिवारी पहाटेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. यापुढे मात्र पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर तापमान अंशा-अंशाने चढेल, अशी शक्यता वर्तविली आहे.


अमरावतीत ५० झाडे पडली

शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने अमरावती शहरासह जिल्ह्याला झोडपले. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, खापर्डे बगिचा, मुख्य बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. जिल्ह्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.


नांदेडला पाचव्या दिवशीही फटका

नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. शनिवारी पहाटेपासून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने आंब्याची झाडे जमीनदोस्त झाली. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, देगलूर तालुक्यात विज पडल्याने दोन जनावरे दगावली. सुगाव येथे आंब्याची २५ ते ३० झाडे उन्मळून पडली आहेत.


भंडारा हिंगोलीत पाऊस, हिंगोलीत हळदीचे नुकसान

भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यात हळद काढणी अंतिम टप्प्यात असून, काढलेली हळद शेतात वाळायला ठेवली असली तरी पुन्हा पावसात भिजून जात आहे. इतर पिकेही मातीत गेली. 


सोलापुरात १८ गावांमध्ये नुकसान

मंगळवेढा तालुक्यात १० ते १२ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल १८ गावांमध्ये पिके व घरांचे नुकसान झाले आहे. २५ घरांवरील पत्रे उडून गेली. वीज पडून तीन मोठी जनावरे दगावली.

Post a Comment

0 Comments