Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल

भारतीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या दोन राज्यांमध्ये ४ जूनऐवजी २ जून रोजी मतमोजणी होणार आहे. 



केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाने सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओदिशा, आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणाही केली होती. लोकसभेची निवडणूक ७ टप्प्यांमध्ये होणार आहे. लोकसभेसाठी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होईल, तर १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.


वरील नियोजनात केंद्रीय निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मोठा बदल केला आहे. या दोन राज्यांमध्ये  आता २ जून रोजी मतमोजणी होणार आहे. पूर्वी ही मतमोजणी 4 जून रोजी होणार होती. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी दोन दिवस आधीच या राज्यातील विधानसभेचे निकाल जाहीर होतील. 


या दोन राज्यांमधील निकाल दोन दिवस आधी जाहीर करण्यामागचं कारण सांगताना केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभांचा कार्यकाळ हा २ जून रोजी समाप्त होणार आहे. तसेच घटनेतील कलम ३२४ आणि कलम १७२ (१) आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार निवडणूक आयोगाने संबंधित राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असतं.


हा नियम विचारात घेऊन निवडणूक आयोगाने शनिवारी घोषित केलेल्या कार्यक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील मतमोजणी ही ४ जूनऐवजी २ जून रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने सांगितले की, केवळ मतमोजणीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र मतदानाचा उर्वरित कार्यक्रम हा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments