दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बेरचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार, नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे आज आपण मन शांत करण्याचे उपाय पाहणार आहोत.
‘चिंता करायची नाही’ म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते शक्य नाही. कारण आपल्या विचारांवर आपले पूर्ण नियंत्रण नसते. म्हणूनच जेव्हा आपल्या मनात असे काळजीचे, भितीचे विचार येणे सुरू होईल, तेव्हा आपल्या मनाला दुसऱ्या कुठल्यातरी विचारात गुंतविणे हाच सोपा पर्याय आहे. किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे, ज्याची भिती वाटते, चिंता वाटते त्या कारणांचा अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाय करणे. विचारांच्या गर्तेत आपले मन शांत राहणे हे आवश्यक आहे. त्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील किंवा काही सवयी बदलाव्या लागतील.
मन शांत करण्याचे 25 उपाय :- काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार, नैराश्य यांसारख्या समस्यांवर मात कशी करावी?
१) ध्यान-धारणा : ध्यान हे काही अवघड आसन नसून केवळ एकाग्रचित्ताने आपल्या अंतर्मनावर लक्ष केंद्रित करण्याची सोपी क्रिया आहे. रोज थोडा वेळ ध्यान केल्याने मन शांत होण्यास मदत होईल.
२) व्यायाम करणे : शरीराला व्यायामाची गरज असते. रोज नियमित व्यायाम करावा. याने आपली तब्येत तंदुरुस्त राहतेच, शिवाय आपण अधिक आनंदी व उत्साही बनतो.
३) भूतकाळ विसरा : प्रत्येकालाच भूतकाळात काहीतरी खटकत असते, काही खंत असते. पण घडून गेलेल्या गोष्टींचा त्रास करून घेतल्याने काही साध्य होत नाही. याउलट वर्तमानात जगायला शिकावे, हा मनःशांतीचा एक प्रभावी उपाय आहे.
४) क्षमा करा : कुणाकडून आपल्या बाबतीत काही चुकले असल्यास त्या गोष्टीची अढी मनात न ठेवता समोरच्या व्यक्तीला क्षमा करा. आणि स्वतःलाही क्षमा करा, म्हणजे विनाकारणचा ताण कमी व्हायला मदत होईल. पण विषय क्षमा करण्या सारखा नसेल, तर परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळा.
५) हसा व हसवा : केवळ एका स्मितहास्याने शरीरात अंतर्गत चांगले बदल होतात. ‘मुन्नाभाई MBBS’ मधला डिन बोमन इराणी पाहिला असेल. त्याच्या मनाविरुध्द घडलं तर तो हसण्याचा प्रयत्न करतो. सिनेमात तो गमतीचा भाग असला तरी, हसल्यावर आपला मेंदू शरीरात काही चांगले हार्मोन्स सोडतो, ज्याने आपल्याला बरे वाटते. म्हणून हसा व हसवत राहा.
६) विनोदी चित्रपट बघा : विचारांपासून दूर पळायचे असल्यास एखादा विनोदी सिनेमा नक्कीच बघा. चित्रपटातील विनोदात रमल्यावर निश्चितच थोड्या वेळासाठी आपण नको असलेल्या ताण तणावापासून दूर राहू शकतो.
७) लोकांना आनंदी बनवणे थांबवा : काही लोकांना सतत दुसऱ्यांना आनंद देण्याची, त्यांना मदत करण्याची सवय असते. पण अशा सवयीलाही मर्यादा असली पाहिजे. प्रत्येक वेळी स्वतःचा आनंद बाजूला ठेऊन इतरांसाठी जगत राहिलात, तर स्वतः साठी जगताच येणार नाही, व अशा स्वभावाची लोकं गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त असते.
८) ज्याची भिती वाटते ते करा : एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला भिती वाटते, तेव्हा आपण ती गोष्ट करायला टाळाटाळ करतो. पण जे करायची भिती वाटते ते करा, असे केल्याने आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो.
९) स्वतःला प्रेरणस्थानी बघा : प्रत्येकाचा कुणी ना कुणी आयकॉन असतो. आपणही दुसऱ्या सारखं असावं असं प्रत्येकाला वाटतं. असा केवळ विचार करण्यापेक्षा स्वतःमध्ये त्या व्यक्तीला बघा. काही निर्णय घेताना ‘ती व्यक्ती आपल्या जागी असती तर काय केले असते’ याचा विचार करून तसे करावे. अश्याने हळूहळू आपणच आपले आयकॉन होऊ शकतो.
१०) नको असलेले नातेसंबंध सोडा : नातेसंबंध आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. पण म्हणून सगळीच नाती चांगलीच असतील असे नाही. काही अशीही नाती असतात, ज्यामुळे आपला ताणतणाव वाढू शकतो. अशावेळी त्या संबंधाचा जास्त विचार न करता त्यापासून शक्य तितके अलिप्त राहणे जास्त हितावह ठरते.
११) स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाका : आपण जी स्वप्ने बघतो, ती एका दिवसात पूर्ण होणार नाहीत, त्यासाठी चिकाटीने सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. मग रोज एक गोष्ट करा, जी तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला अंगणात बाग तयार करायची असेल, तर रोज किमान एक रोप लावणे, खत-पाणी घालणे, झाडांची निगा घेणे हे करावे लागेल. तेव्हा वर्षभरात बाग तयार होईल.
१२) छंद जोपासा : प्रत्येकात काही ना काही कला ही असतेच. आपल्यातल्या कलागुणांना ओळखा व त्याचा छंद लागू द्या. लिखाण, वाचन, गायन, वादन, नृत्य जे काही आवडेल ते करा. यामुळे उत्साह वाढून नवनवीन गोष्टी शिकता येतील.
१३) मनस्ताप टाळा : छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारी चिडचिड, रागराग सोडून द्या. लहान सहान गोष्टीचा मनस्ताप करण्या पेक्षा, शांत राहण्याचा सराव करा. जेवढे शांत राहता येईल तेवढा अधिक फायदा होईल.
१४) प्रथम स्वतःवर प्रेम करा : स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा स्वतःची काळजी घ्याल, स्वतःच्या आवडीला प्राधान्य द्याल, तेव्हा आपोआपच आपण आनंदी राहू शकतो.
१५) नृत्य : प्रत्येक जण काही नृत्यकलेत पारंगत असणार नाही. पण वाजेल त्या संगीतावर मनसोक्त नृत्य केल्याने नक्कीच हलकं व मोकळे वाटेल.
१६) एकांतात जा : एकट्याने चालायला गेलो किंवा एकट्याने भ्रमंती केली तर माणूस स्वतःच्या अधिक जवळ जातो. एकटे असताना आपले विचार स्पष्ट होतात व आंतरिक शांती मिळते.
१७) नवनवीन गोष्टी शिका : माणूस मरे पर्यंत शिकत राहिला तरीही कधीच संपणार नाही एवढं शिकायला आहे या जगात आणि शिकायला वयाची अट नाही. आजच्या युगात तर नवीन गोष्टी शिकणे खूप सुकर आहे. नवीन काही तरी शिकत राहा, त्यामुळे मेंदू कार्यक्षम राहण्यास मदत होईल.
१८) प्रेरणादायी पुस्तके वाचा : वाचन हा उत्तम छंद आहे. आपल्या वाचनात प्रेरणादायी पुस्तके व कथा यांचा समावेश केल्याने आपल्याला नवीन ऊर्जा प्राप्त होईल.
१९) सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा : सोबत खूप महत्त्वाची आहे. आपण जशा लोकांसोबत राहतो तसे आपले विचार होत जातात. म्हणून नेहमी सकारत्मक विचार असणाऱ्या सोबतीची निवड करा. याने आपल्या आयुष्यावरही सकारात्मक प्रभाव पडेल.
२०) अपराधीपणा सोडा : मनात एखाद्या गोष्टीची खंत घर करून असेल तर त्याचा त्रास होतोच. जे झाले ते बदलता येणार नाही, असा विचार करून अपराधी भावना सोडून द्या. त्याऐवजी सर्वकाही मंगल होण्याची प्रार्थना करा, प्रार्थनेत देखील खूप शक्ती असते.
२१) नवीन सवयी लावा : काही नवीन सवयी लावून, काही जुन्या सवयी सोडून आपण मनःशांती मिळवू शकतो.
२२) काही बदल करा : नकारात्मक विचारा पासून लांब जायचे असेल, तर जीवनात थोडे थोडे बदल करावे लागतील. पुढे चालत राहा व आशावादी वृत्ती ठेवा. आयुष्य सुंदर आहे.
0 Comments