"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच !
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शुक्रवारपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी मराठा आणि कुणबी एक आहेत असा आदेश काढावा आणि याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मनोज जरांगे यांची मुख्य मागणी आहे. त्यासाठी हैद्राबाद गॅजेट, सातारा गॅजेट लागू करुन मराठ्यांच्या पोरांचे कल्याण करावे अशी ते मागणी करत आहेत.
मनोज जरांगे यांच्या मागण्यासंदर्भात बोलताना, "मनोज जरांगे पाटील ज्या काही मागण्या करत आहेत. त्याकडे आम्ही सकारात्मकपणेच बघत आहोत. कुठेही नकारात्मकता नाही. पण कुठलीही मागणी मान्य करायची, तर ती कायद्याच्या चौकटीत बसायला हवी," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटले आहे.
तसेच सरसकट ओबीसीमध्ये समावेश वैगेरे, अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याकडे सामाजिक बांधिलकीचाही प्रश्न आहे. कारण न्यायालयाचे काही निर्णय आले आहेत, त्या निर्णयांचाही आपल्याला अवमान करता येणार नाही. यामुळे मला असे वाटते की, कायद्याच्या चौकटित जे काही बसते ते निर्णय घेण्यासाठी सरकार तया आहे."
फडणवीस म्हणाले, "कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असाच निर्णय करा, असं कुणी म्हटलं तरी, सरकारने खूश करण्यासाठी असा निर्णय घेतला, तरी तो एक दिवसही टिकणार नाही. मग त्यात मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल. यामुळे आम्ही चर्चा करत आहोत." एवढेच नाही तर, "आमच्या विखे पाटल्यांच्या नेतृत्वात उप समितीत चर्चा सुरू आहे. एजींसोबत चर्चा सुरू आहे. कायदेशीर सल्लागारांसोबत चर्चा सुरू आहे. जे काही न्यायालयाचे निर्णय आहेत. त्याचीही पडताळणी सुरू आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू," असेही फडणवीस म्हणाले.
0 Comments